उद्देश

माणूस उभारणी ते व्यक्ती विकास

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात व्यक्ती हा राष्ट्राचा पाया मानला जातो. डॉ. हेडगेवार यांनी मांडलेली ही संकल्पना केवळ शारीरिक व्यायामापुरती मर्यादित नसून, ती बौद्धिक, मानसिक आणि अध्यात्मिक विकासावर भर देते. शाखेतील संस्कारातून व्यक्तींमध्ये शिस्त, राष्ट्रप्रेम, नि: स्वार्थ सेवा आणि संघटन कौशल्य रुजवले जाते. संघ मानतो की, जर देशातील प्रत्येक माणूस चारित्र्यसंपन्न आणि सुसंस्कृत असेल, तर राष्ट्र आपोआपच बलशाली होईल.

चंद्रकांतदादा पाटील यांचे सार्वजानिक जीवन हे संघ संस्कारांचे एक जिवंत उदाहरण आहे. आठराव्या वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत ABVP दाखल झाल्यापासून त्यांनी राष्ट्र प्रथम हेच सूत्र जपले. संघाच्या माणूस उभारणी प्रक्रियेने त्यांच्यामध्ये जे नेतृत्वगुण रुजवले, त्याचेच रूपांतर पुढे व्यापक ‘व्यक्ती’ विकासाच्या प्रकल्पांमध्ये झाले.
समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी त्यांनी विविध प्रकल्प हाती घेतले आहेत:

  • शिक्षण आणि कौशल्य: कोथरूडमधील ‘डेस्टिनेशन कोवर्किंग’ किंवा कोल्हापूरमधील ‘विद्याप्रबोधिनी’च्या माध्यमातून आधुनिक रोजगारा आणि तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करणे, हा व्यक्ती विकासाचाच भाग आहे.
  • महिला सक्षमीकरण: ‘उन्नती प्रकल्प’ ‘मानसी’ आणि ‘सुखदा’ यांसारख्या उपक्रमांतून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे, हे संघाच्या ‘स्वावलंबी समाज’ या संकल्पनेला पूरक आहे.
  • वंचितांची सेवा: जळगावमधील ‘दीपस्तंभ मनोबल’ असो किंवा कोल्हापुरातील ‘खेळघर’, वंचितांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश नेणे हीच खरी माणूस उभारणी आहे.

रा. स्व. संघाची ‘माणूस उभारणी’ ही प्रक्रिया व्यक्तीला आतून घडवते, तर चंद्रकांतदादांचा ‘व्यक्ती विकास’ हा दृष्टिकोन त्या व्यक्तीला बाह्य जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक साधने (शिक्षण, आरोग्य, रोजगार) पुरवतो. जेव्हा शाखेतील संस्कारांना आधुनिक उपक्रमांची जोड मिळते, तेव्हाच एक ‘संपूर्ण माणूस’ उभा राहतो.

चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्याकडे पाहताना संघाने दिलेल्या ‘माणूस उभारणी’च्या मंत्राला आधुनिक काळातील ‘व्यक्ती विकासा’च्या तंत्राशी जोडले आहे. त्यांच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सामान्य माणसाचा विकास आणि त्यातून राष्ट्र उभारणी हाच मूळ उद्देश दडलेला आहे.

विद्यार्थी चळवळीतील एक उत्तुंग नेतृत्व (१९८० – १९९४)

१९८० ते १९८३ या काळात चंद्रकांतदादा पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ (एबीव्हीपी) रुजवण्याचे आणि तिचा विस्तार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या निष्ठेमुळे विद्यार्थ्यांचा संघटनेतील सहभाग लक्षणीय वाढला. त्यांच्या याच कौशल्याची दखल घेऊन त्यांची ‘महाराष्ट्र राज्य संघटनमंत्री’ पदी नियुक्ती करण्यात आली, जिथे त्यांनी एका विखुरलेल्या चळवळीला सुसंघटित आणि गतिमान स्वरूप दिले.

१९८८-८९ च्या सुमारास त्यांनी विविध शैक्षणिक स्तरावरील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन निवडणुका आणि कॅम्पस उपक्रमांत सक्रिय केले. यामुळे प्रशासकीय निर्णयांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व वाढले. त्यांच्याच दूरदर्शी नेतृत्वाखाली एबीव्हीपीने ‘मुंबई विद्यापीठ’ निवडणुकीत ऐतिहासिक विजय नोंदवला.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि सांस्कृतिक मूल्यांची जोपासना व्हावी, यासाठी त्यांनी विद्यापीठ स्तरावर राष्ट्रीय सण साजरे करण्यावर भर दिला. केवळ आंदोलनच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी त्यांनी डीआयपेक्स (DIPEX), टीएसव्हीपी (TSVP) आणि केएसव्हीपी (KSVP) सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले. या माध्यमातून त्यांनी तांत्रिक व कृषी शिक्षणातील विद्यार्थ्यांना उद्योजकता आणि व्यावसायिक प्रशिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

१९९० ते १९९४ या काळात त्यांनी एबीव्हीपीचे ‘राष्ट्रीय सरचिटणीस’ म्हणून धुरा सांभाळली. या काळात त्यांनी ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना उर्वरित भारताशी जोडण्यासाठी ‘अंतर्छात्र जीवन दर्शन’ सारखे भावनिक एकात्मतेचे प्रकल्प राबवले. त्यांच्या कार्यकाळातील सर्वात मैलाचा दगड म्हणजे चलो काश्मीर आंदोलन. श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यासाठी त्यांनी सुमारे २०,००० विद्यार्थ्यांना संघटित केले. राजकीय विरोध आणि अटकेसारख्या संकटांना न डगमगता त्यांनी ही एकता आणि सार्वभौमत्वाची लढाई यशस्वीपणे लढली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संस्थात्मक कार्याचा प्रवास

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) पूर्णवेळ कार्य संपल्यानंतर, चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (RSS) सक्रिय जबाबदारी स्वीकारली. १९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतात विभाग सहकार्यवाह म्हणून प्रभावी कार्य केले. त्यानंतर, १९९९ ते २००४ या काळात पश्चिम महाराष्ट्रात संघाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध सेवा प्रकल्पांमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

सतत १३ वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून निष्ठेने काम करणाऱ्या चंद्रकांतदादांनी ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ या संस्थेच्या जडणघडणीत योगदान दिले. जानेवारी १९९४ ते एप्रिल २००० पर्यंत त्यांनी प्रबोधिनीच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिले. त्यांच्या संघटनात्मक कौशल्यामुळे एप्रिल २००० मध्ये त्यांच्याकडे प्रबोधिनीच्या सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, जी त्यांनी मार्च २०१३ पर्यंत यशस्वीपणे सांभाळली.

एक निष्ठावान संघटक ते कुशल जननेता

दिवंगत नेते प्रमोदजी महाजन, गोपीनाथराव मुंडे आणि नितीन गडकरी यांच्या आग्रहाखातर २००४ मध्ये चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले. सुरुवातीच्या काळात, म्हणजेच २००७ पर्यंत, त्यांनी राज्य सचिव आणि पश्चिम महाराष्ट्र विभागाचे प्रमुख म्हणून पक्षाची धुरा सांभाळली. या काळात त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांचे जाळे विणले आणि पक्षाचा पाया मजबूत करण्यावर भर दिला.

त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत, २००७ ते २०१० या काळात त्यांची राज्य सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली. ज्यामुळे भाजपमधील त्यांचा प्रभाव अधिक वाढला. त्यांच्यातील संघटनात्मक कौशल्यामुळे २०१५ पर्यंत त्यांनी राज्य उपाध्यक्ष म्हणून यशस्वी कामगिरी केली. विशेषतः ग्रामीण भागांत आणि भाजपसाठी कठीण मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच शहरी भागांपलीकडे ग्रामीण महाराष्ट्रातही कमळ खऱ्या अर्थाने फुलले.

जुलै २०१९ मध्ये, चंद्रकांतदादा पाटील यांची भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली, जो त्यांच्या राजकीय प्रवासातील एक सुवर्णक्षण ठरला. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पक्षाने २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश संपादन केले.